सांगली : सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन मगदूम यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. महापालिकेच्या मुख्य कार्यालयात प्रशासनाच्या उपस्थितीत पदभार स्वीकृतीचा औपचारिक कार्यक्रम पार पडला.
पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सांगली, मिरज, कुपवाड शहरांचा सर्वांगीण आणि समतोल विकास साधण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि आरोग्य सेवांसह नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनासोबत समन्वय ठेवून काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येईल, तसेच प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी लवकरच आवश्यक निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमास महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध पक्षांचे नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या वतीने नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, मंगळवार (दि. 10 फेब्रुवारी) रोजी मनपा मुख्यालयात आयोजित विशेष सभेत महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशी व उपमहापौर पदासाठी गजानन मगदूम यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली होती. विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार पार पडलेल्या या प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










