सांगली : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही बहुमत काठावर असल्याने सत्तास्थापनेसाठी पडद्यामागे जोरदार वाटाघाटी सुरू आहेत. या राजकीय घडामोडींमध्ये अजित पवार गट आणि शिंदेसेना निर्णायक ठरत आहेत.
पेच कुठे अडकला?
राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे ६ सदस्य निवडून आले असून स्पष्ट बहुमतासाठी दोन्ही आघाड्यांना त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र या गटाने अध्यक्षपदाची अट घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मिरजेत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) अध्यक्षपदावर ठाम असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे शिंदेसेनेचे ७ सदस्यही किंगमेकर भूमिकेत आहेत. मात्र त्यांच्या पाठिंब्याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. अशातच महायुतीचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होणार असल्याचा दावा केला आहे.
“दादा माझे हितचिंतक” – जयंत पाटलांचा मिश्किल टोला
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली.
“चंद्रकांत दादा माझे सगळ्यात मोठे हितचिंतक आहेत. दादांनी घोषणा केली आहे, त्यावर मी बोलून काय उपयोग? दादांच्या विरोधात मी काही बोलत नाही,” असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष उपरोध व्यक्त केला.
दोन्ही बाजूंनी ‘गृहित’ राजकारण?
राज्यात महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी असल्याने जिल्हा परिषदेतही त्यांचा पाठिंबा मिळेल, असा भाजपचा हिशेब आहे. तर दुसरीकडे आघाडीकडूनही दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेचा दाखला देत अजित पवार गटाचा पाठिंबा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र अजित पवार गटाने “आम्हाला गृहित धरू नका” असा स्पष्ट संदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे अध्यक्षपद, उपाध्यक्षपद किंवा सभापतीपदाच्या वाटाघाटींवर अंतिम समीकरण ठरणार आहे.
आता पुढे काय?
अध्यक्षपदावर तडजोड होणार की उपाध्यक्ष-सभापती पदांवर साटेलोटे होणार, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. तोपर्यंत सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा थरार कायम आहे.
हेही वाचा: सांगली महानगरपालिकेची 66 कोटींची घरपट्टी वसुली; नागरिकांच्या तक्रारींसाठी दर गुरुवारी 3 ते 5 विशेष वेळ.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










