सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): खाजगी किंवा मोठ्या रुग्णालयांतील महागड्या शस्त्रक्रिया आणि दुर्धर आजारांच्या उपचारांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर असतो. अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा आधार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी’ (CM Relief Fund – CMRF) ही अत्यंत महत्त्वाची योजना राबवली जाते. मात्र, या योजनेसाठी नेमकी कोणती कागदपत्रे लागतात आणि ऑनलाइन अर्ज कसा सादर करायचा, याची स्पष्ट माहिती नसल्याने अनेक गरजू रुग्ण या लाभापासून वंचित राहतात. आता महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलमार्फत या योजनेसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे.
२० दुर्धर आजारांसाठी मिळते थेट आर्थिक मदत
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत राज्यातील पात्र रुग्णांना ऑनलाइन प्रणालीद्वारे २० दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. विशेष म्हणजे, ही मदत थेट रुग्णाच्या हातात न देता, आवश्यक कागदपत्रांच्या छाननी आणि पडताळणीनंतर मंजूर झालेली रक्कम संबंधित रुग्णालयाच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक पात्र रुग्णाला तीन वर्षांतून एकदा या आर्थिक सहाय्याचा लाभ घेता येतो.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी आवश्यक कागदपत्रे
शासनाच्या अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार, वैद्यकीय मदतीसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे:
- ओळख व निवासाचा पुरावा: रुग्णाचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड.
- उत्पन्नाचा दाखला: कुटुंबाचे सर्व स्रोतांचे मिळून वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांपर्यंत (₹१,६०,०००) असल्याचा तहसीलदारांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला.
- फोटो (जिओ-टॅग अनिवार्य): रुग्ण आणि अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो, तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा जिओ-टॅग (Geo-tag) असलेला फोटो.
- उपचार खर्चाचे अंदाजपत्रक: संबंधित रुग्णालयाच्या अधिकृत लेटरहेडवर उपचारासाठी येणाऱ्या खर्चाचे प्रमाणपत्र व अंदाजपत्रक.
- वैद्यकीय अहवाल: रुग्णाच्या आजाराशी संबंधित सर्व वैद्यकीय आणि तपासणी अहवाल.
- अपघात प्रकरणांसाठी विशेष अट: अपघातामुळे उपचार घ्यावे लागत असल्यास एफआयआर (FIR) ची प्रत किंवा पोलीस डायरी सादर करणे बंधनकारक आहे; या प्रकरणात केवळ एमएलसी (MLC) अहवाल स्वीकारला जाणार नाही.
- अवयव प्रत्यारोपण असल्यास: अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण व दात्याचा अधिकृत मॅचिंग रिपोर्ट (Matching Report).
अर्ज कुठे आणि कसा करायचा?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत ऑनलाइन प्रणालीद्वारे हा अर्ज सादर केला जातो. संबंधित रुग्णालयामार्फत आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाइन अर्ज पाठवला जातो. नागरिक आणि रुग्णांचे नातेवाईक महाराष्ट्र शासनाच्या cmrf.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती (Application Status) घरबसल्या ऑनलाइन तपासू शकतात.
अधिक माहितीसाठी किंवा आपत्कालीन मदतीसाठी नागरिकांना २४/७ आपत्कालीन टोल-फ्री क्रमांक १८०० १२३ २२११ तसेच helpdesk.cmrf@maharashtra.gov.in या अधिकृत ई-मेल आयडीवर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
📢 मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



