सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्याच्या दळणवळण आणि विकासाला मोठी चालना देणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या (Nagpur-Goa Shaktipeeth Expressway) भूसंपादन मोजणी प्रक्रियेला सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला.
प्रशासनाच्या वतीने माहुली गावातून मोजणी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र शेतकऱ्यांनी जमीन देण्यास नकार दिल्याने ही मोजणी तात्पुरती थांबवण्यात आली आहे.
मोजणी पथक परिसरात दाखल होताच माहुली, भाग्यनगर आणि नेवरी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आपली भूमिका मांडली. या वेळी महिला आणि ग्रामस्थांनीही उपस्थित राहून भूसंपादनाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून पुढील निर्णय घेता यावा, यासाठी प्रशासनाने सध्या मोजणीचे काम स्थगित केले आहे.
हेही वाचा: सांगली महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती पैलवान दिलीप सूर्यवंशी यांचे दुःखद निधन.
राज्यात १६२ गावांची मोजणी पूर्ण; सांगलीत ७२ किलोमीटरचा पट्टा
दरम्यान, या ८५६ किलोमीटर लांबीच्या नागपूर-गोवा महामार्गाच्या कामात राज्यभरात प्रगती झाली आहे. नियोजित ४०९ गावांपैकी आतापर्यंत १६२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित २४७ गावांमध्ये मोजणीचे काम सुरू आहे.
या महामार्गाचा ७२ किलोमीटरचा पट्टा सांगली जिल्ह्यातून जाणार असून, यामुळे जिल्ह्याच्या उद्योग, व्यापार आणि कृषी माल वाहतुकीला चालना मिळेल, असा प्रशासनाचा दावा आहे. डिसेंबर २०२७ पर्यंत भूसंपादन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले असून, स्थानिक शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
📢 सांगली जिल्ह्यातील विकास प्रकल्प, महामार्ग अपडेट्स आणि महत्त्वाच्या स्थानिक बातम्या सर्वात आधी वाचण्यासाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा. 👇



