Sangli National Nutrition Month 2025 | सांगली : महिला व बाल विकास विभागामार्फत सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण माह 2025 ला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री विशाल सविता तेजराव नरवाडे (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते हा उपक्रम सुरू झाला.
कार्यक्रमात “पोषण प्रतीज्ञा” घेण्यात आली तसेच आपली सांगली, पोषणात चांगली या घोषवाक्यासह विविध जनजागृती उपक्रमांना प्रारंभ झाला.
राष्ट्रीय पोषण माह 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर 2025 दरम्यान साजरा करण्यात येत आहे. या काळात पोषणविषयक जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जाणार असून यामध्ये संतुलित आहार, बालकांचे पोषण शिक्षण, आहार पद्धती, पुरुष सहभाग, Vocal for Local आणि एकात्मिक पोषण या मुद्द्यांवर विशेष भर दिला जाणार आहे.
सीईओ श्री विशाल नरवाडे यांनी या वेळी बोलताना दैनंदिन आहारात साखर व तेलाचे प्रमाण कमी करून संतुलित आहार घेण्याचे आवाहन केले. तसेच स्थानिक पातळीवर उपलब्ध ताज्या व पारंपरिक पदार्थांचा आहारात समावेश करून आरोग्यदायी जीवनशैली जोपासावी असेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमात महिला व बाल विकास विभागाचे अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा : कोयनेतून विसर्ग वाढला, कृष्णेची पाणी पातळी वाढली; नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली.