सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे सांगलीसह राज्यातील काही महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या हालचालींना अचानक ब्रेक लागला आहे. शोकाकुल वातावरणामुळे पुढील काही दिवस कोणताही अंतिम निर्णय होण्याची शक्यता कमी असून, पुढील आठवड्यातच सत्तास्थापनेबाबत हालचाली पुन्हा सुरू होतील, असे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत आहे.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवडणूक 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू झाल्या होत्या. महापालिकेत भाजपचे 39 नगरसेवक असून, अवघ्या एका जागेमुळे बहुमत भाजपकडे नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा करण्यात आली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत संकेत दिले होते.
मात्र स्थायी समितीत बहुमत मिळवण्यासाठी केवळ भाजप-शिवसेना युती पुरेशी ठरत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी अशी त्रिपक्षीय सत्ता रचना होण्याची शक्यता होती.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती होती. सांगली महापालिकेत एकत्र सत्तास्थापनेबाबत निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळाले होते. बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र बुधवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी समोर आली, आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुन्न झाले असून, सत्तास्थापनेसंबंधी सुरू असलेल्या सर्व हालचाली तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, सांगली महापालिकेत महापौरपद भाजपकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. शिवसेनेने उपमहापौर पदावर दावा केला आहे, तर राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सभापतीपद व काही प्रभाग समित्यांवर हक्क सांगण्यात आला आहे. मात्र सध्याच्या शोककाळात सत्ता वाटपाबाबत कोणतीही अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.
अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय निर्णय पुढे ढकलले जाणे हे स्वाभाविक असून, पुढील आठवड्यात वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा: ईश्वरपूर पोलिसांची मोठी कारवाई; चार देशी पिस्तुले व काडतुसे जप्त, एक आरोपी अटकेत.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










