Sangli Politics News | सांगली : राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी राज्यपालांना पत्र देत महाराष्ट्र विधानमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे, अशी मागणी केली आहे.
आमदार जयंत पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी व पूरामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली असून, काही ठिकाणी जमीनही खरडून वाहून गेली आहे. अनेक जनावरे दगावली, घरे कोसळली, तर काही नागरिकांचा जीव गेला आहे. संपूर्ण राज्यात हाहाकार माजला असून शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, “अशा वेळेस सरकारने भरीव मदत जाहीर करणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत राज्य सरकारकडून ठोस निर्णय होताना दिसत नाही. शेतकरी आणि नागरिकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा व्हावी आणि नुकसानभरपाईसाठी त्वरित पॅकेज जाहीर व्हावे, यासाठी विधानमंडळाचे विशेष अधिवेशन घेणे आवश्यक आहे.”
जयंत पाटील यांनी राज्यपालांना पाठवलेल्या या पत्रात स्पष्ट केले आहे की, तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावून शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले गेले पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने ही अधिकृत मागणी करण्यात आली आहे.
हेही वाचा: झोपलेल्या पत्नीवर नवऱ्याने चाकूने वार करून केली हत्या; परिसरात एकच खळबळ.