Ladki Bahin Yojana Installment Delay E-KYC Update Sangli | सांगली : राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नसल्याने सांगली जिल्ह्यातील हजारो महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. डिसेंबर महिना अर्ध्यावर आला तरीही पैसे न मिळाल्याने अनेक महिलांनी तहसील कार्यालये, अंगणवाडी सेविका व पंचायत समित्यांकडे चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, शासनस्तरावरून नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास लाभार्थी महिलांच्या खात्यात एकूण ४,५०० रुपये जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
निवडणूक आचारसंहितेमुळे विलंब?
प्रशासनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेचा निधी वितरणावर परिणाम झाल्याची चर्चा आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सांगली जिल्ह्यात E-KYC न केलेल्यांचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी E-KYC बंधनकारक करण्यात आली असून, 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही अनेक महिलांची KYC प्रक्रिया अपूर्ण असल्याची माहिती समोर येत आहे. इंटरनेट अडचणी, ओटीपी न येणे, आधार माहितीतील तफावत यामुळे ग्रामीण भागातील महिलांना e-kyc प्रक्रियेत अडथळे येत आहेत.
प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, KYC पूर्ण न केल्यास पुढील हप्त्याचा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे महिलांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता अधिकृत संकेतस्थळावरून तातडीने e-kyc प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच स्पष्ट भाष्य केले आहे. अंबरनाथ येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी “लाडकी बहीण योजना बंद होणार नाही” असे स्पष्ट केले. या योजनेबाबत कोणतीही शंका ठेवण्याचे कारण नसून, शासनाकडून पारदर्शक पद्धतीने लाभ देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. या वक्तव्यानंतर सांगली जिल्ह्यातील लाभार्थी महिलांमध्येही काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. मात्र, हप्त्यांच्या वितरणाबाबत अधिकृत तारीख व वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा अद्याप कायम आहे.
हेही वाचा: माजी महापौरांच्या मनधरणीसाठी खासदार विशाल पाटील मैदानात; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










