इस्लामपूर : रेठरे धरण (ता. वाळवा) परिसरात शनिवारी रात्री भीषण प्रकार घडला. अचानक बिबट्याने दुचाकीवर झडप टाकल्याने झालेल्या अपघातात शिराळा तालुक्यातील कणदूर येथील एकाच कुटुंबातील तिघे जखमी झाले. सध्या त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींमध्ये विष्णू दादू पाटील (47), पत्नी वनिता (39) आणि मुलगी आयेशा (13) यांचा समावेश आहे. ते रेठरे धरण परिसरातील नातेवाईकांकडे जात असताना हा प्रकार घडला. इकबाल संदे यांच्या वस्तीजवळील पुलाजवळ अचानक शेतातून बिबट्याने रस्ता ओलांडण्यासाठी झेप घेतली. दुचाकीच्या पुढच्या चाकाला धडक बसताच वाहन घसरले आणि तिघेही रस्त्यावर आपटून गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर ग्रामविकास अधिकारी विकास वनारे आणि विकास पाटील यांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीत समजले की विष्णू पाटील यांच्या कपाळासह हात, पाय व बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची पत्नी वनिता यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असून मुलगी आयेशाच्या कपाळ व गुडघ्यांना मार लागला आहे. अपघातानंतर संपूर्ण कुटुंब भेदरून गेले होते.
वनरक्षक शहाजी पाटील, विलास कदम आणि पांडुरंग उगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक ग्रामस्थांनी भीती व्यक्त केली असून वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा: सोरडी गावात शेतजमिनीच्या वादातून मुलाकडून वडिलांवर हल्ला.