सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील विकासकामांमध्ये होणारी दिरंगाई प्रशासनाकडून सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत मिरज शहरातील वंटमुरे कॉर्नर येथील रस्त्याचे काम वेळेत सुरू न केल्याबद्दल संबंधित ठेकेदारावर ५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी दिले आहेत.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, सदर रस्ता कामासाठी यापूर्वी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या कालावधीत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याचे आढावा बैठकीदरम्यान निदर्शनास आले. या गंभीर दिरंगाईची दखल घेत आयुक्तांनी संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक
सोमवार (दि. २९ डिसेंबर २०२५) रोजी आयुक्त दालनात सार्वजनिक बांधकाम विभागाची विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सन २०२४-२५ आणि २०२५-२६ या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांची सद्यस्थिती, वर्क ऑर्डरची तारीख, कामाची मुदत आणि प्रत्यक्ष प्रगती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत काही ठिकाणी कामे सुरू करण्यात झालेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी विकासकामांतील हलगर्जीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
१५ दिवसांत प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश
शहरातील सर्व सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांची वेळेत पूर्तता आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आयुक्तांनी पुढील निर्देश दिले आहेत.
प्रत्येक कामासाठी साप्ताहिक आणि मासिक कृती आराखडा तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच दर १५ दिवसांनी प्रत्यक्ष भौतिक प्रगतीचा तुलनात्मक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व कामांचे जिओ-टॅग फोटो सादर करणेही आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कामांमध्ये दुर्लक्ष किंवा दिरंगाई झाल्यास केवळ ठेकेदारांवरच नव्हे, तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल, असे संकेत यावेळी देण्यात आले.
- सांगली–मिरज रोडवर दुचाकीची पाठीमागून धडक; कोल्हापूरच्या 62 वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू
- ट्रॉलीला ओव्हरटेक करताना मागून एसटीची धडक; विट्यात 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- भाजी महाग, चिकन स्वस्त? सांगलीत गवारीच्या दराने ग्राहक हैराण
- विश्रामबाग मंगळवार बाजार चौकात नाला तुंबण्याची भीती; नाल्यात झाडी वाढल्याने सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा
- जतचा दुष्काळ लवकरच संपणार? 65 गावांना पाणी, 26,500 हेक्टर सिंचनाचा मार्ग मोकळा
- राज्यात 2000 नवीन ग्रंथालयांना मान्यता; सांगलीतील ग्रंथोत्सवात पालकमंत्र्यांची घोषणा









