सांगली : यशवंतपूर–निजामुद्दीन संपर्क क्रांती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12629/12630) ला सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्राद्वारे मागणी केली होती. मात्र या मागणीवर अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी झालेली नसल्याने हा विषय अद्याप प्रलंबित आहे.
विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 26 ऑगस्ट 2024 रोजी रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सांगली जिल्ह्याचे आर्थिक, औद्योगिक व कृषी महत्त्व स्पष्ट केले आहे. सांगली हा साखर, हळद आणि द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा असून येथे सुमारे 30 साखर कारखाने, फाउंड्री, अभियांत्रिकी आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित अनेक उद्योग कार्यरत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पत्रात सांगली रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या व थांबणाऱ्या गाड्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधा आणि नवीन थांब्यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. यामध्ये संपर्क क्रांती एक्सप्रेसला सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच सांगली आणि किर्लोस्करवाडी स्थानकांवर कोचिंग टर्मिनल, पिट लाईन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, अतिरिक्त तिकीट खिडक्या, चौकशी काउंटर, रिटायरिंग रूम, क्लोक रूम, पार्सल बुकिंग कार्यालय तसेच किर्लोस्करवाडी स्थानकाचा ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत समावेश करण्याबाबतही मागण्या मांडण्यात आल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील प्रवासी, सामाजिक संघटना आणि रेल्वेप्रेमी गेल्या काही काळापासून या गाडीच्या थांब्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. सोशल मीडियावरही या संदर्भातील पत्र पुन्हा चर्चेत आले आहे, मात्र रेल्वे बोर्डाकडून याबाबत अद्याप कोणताही निर्णय किंवा अधिकृत सूचना जाहीर करण्यात आलेली नाही.
हेही वाचा: ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाईन सेवांचा नागरिकांनी अधिकाधिक लाभ घ्यावा – जिल्हाधिकारी अशोक काकडे.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










