सांगली : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) दि. १० फेब्रुवारी ते ११ मार्च २०२६ दरम्यान तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १० वी) दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत होत असून, या परीक्षा भयमुक्त, पारदर्शक आणि गैरप्रकारविरहित पद्धतीने पार पाडण्यासाठी सांगली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १०वी व १२वी परीक्षांच्या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेसाहेब लोंढे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन गायकवाड, महावितरणच्या कार्यकारी अभियंता तृप्ती दीपंकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विकास सलगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले की, प्रत्येक परीक्षा केंद्रावरील सर्व वर्गखोल्यांमधील सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असावेत. परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा तसेच अखंडित वीजपुरवठा राहील याची दक्षता घ्यावी. परिक्षकांनी परीक्षा कालावधीत कस्टडी सोडू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोहोचता यावे, यासाठी एस. टी. बससेवा नियमितपणे सुरू ठेवावी. परीक्षा केंद्रांवर स्वच्छता, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व आवश्यक फर्निचर उपलब्ध आहे की नाही, याची दररोज पडताळणी करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था दर्शविणारा फलक लावावा. प्रवेशपत्र आणि ओळखपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांची दररोज तपासणी करावी. परीक्षेच्या कामाशी संबंध नसलेल्या कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये. सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र वापरणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा: जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक कार्यक्रमात बदल; 7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









