सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झाल्यानंतर निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर करण्यात आलेल्या भाजपच्या SANGLI ‘VISION 2026–2031’ जाहीरनाम्याकडे आता नागरिकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आयटी पार्क, सेफ सिटी, कवलापूर विमानतळ, नमामि कृष्णे योजना, मेडिकल हब, २४ तास पाणीपुरवठा, ई-बस सेवा, झोपडपट्टीमुक्त शहर अशा अनेक महत्त्वाकांक्षी घोषणांची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी आणि कोणत्या टप्प्यांत होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
भाजपच्या जाहीरनाम्यात औद्योगिक विकासासाठी पंचतारांकित सुविधा, आयटी पार्क उभारणी, कवलापूर येथे विमानतळ व लॉजिस्टिक हब, तसेच मिरज शहराला मेडिकल हब म्हणून विकसित करण्याचा उल्लेख आहे. याशिवाय ‘सेफ सांगली’ उपक्रमांतर्गत सीसीटीव्ही व एआय-आधारित मॉनिटरिंग, महिला सुरक्षेसाठी उपाययोजना, तसेच हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि ई-बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
कृष्णा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘नमामि कृष्णे’ योजनेअंतर्गत नदीकाठ विकास, सांडपाणी शुद्धीकरण आणि पर्यटनाला चालना, तसेच पूर नियंत्रणासाठी MRDP प्रकल्प राबवण्याचा जाहीरनाम्यात समावेश आहे. त्याचबरोबर ४५० कोटींच्या वारणा उद्भव योजनेतून २४ तास पाणीपुरवठा, नवीन पाणी टाक्या, भुयारी गटार योजना, रस्ता विकास आणि रिंग रोडसारख्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
शिक्षण व सामाजिक क्षेत्रात महानगरपालिकेच्या शाळांचे आधुनिकीकरण, स्पर्धा परीक्षा केंद्रे, अभ्यासिका, तर आरोग्य क्षेत्रात मध्यवर्ती निदान केंद्र आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची घोषणा करण्यात आली होती. यासोबतच झोपडपट्टी धारकांना हक्काची घरे, व्यापारी संकुले, भाजी मंडई, डॉग शेल्टर, नाट्यगृह, गार्डन आणि अम्युजमेंट पार्कसारख्या नागरी सुविधा उभारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
आता सत्ता स्थापन झाल्यानंतर या सर्व घोषणांसाठी निधी, प्रशासकीय मंजुरी, राज्य व केंद्र सरकारची भूमिका, तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणीचे टप्पे काय असतील, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. विशेषतः पहिल्या ६ महिने ते एक वर्षात कोणते प्रकल्प सुरू होतील, कोणते प्रस्तावाच्या टप्प्यात राहतील आणि कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल, याबाबत स्पष्ट रोडमॅप जाहीर होणार का, हा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
निवडणूक जाहीरनाम्यात मांडलेल्या विकासदृष्टीकोनामुळे नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या असल्या तरी, प्रत्यक्ष अंमलबजावणीच खऱ्या अर्थाने शहराच्या विकासाची दिशा ठरवणार आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा : पहिल्याच निवडणुकीत विजय; 23 व्या वर्षी नगरसेवकपदाची जबाबदारी.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










