सांगली : सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या हिंसक घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासांत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विष्णू सतीश वडर (वय २३, रा. वडर कॉलनी) याच्यावर गुरुवारी दुपारी कॉलेज कॉर्नर परिसरातील एन. एस. सोटी लॉ कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. नागरिकांनी त्याला तत्काळ वसंतदादा शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विश्रामबाग पोलिसांनी या घटनेनंतर तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयितांचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन हेमंत पाटील (वय 23, रा. रत्नदीप हौसिंग सोसायटी, कुपवाड) आणि आदित्य प्रमोद वालकर (21, रा. राणाप्रताप चौक, कुपवाड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघांनाही चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून, त्यांच्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, संशयित व मृत तरुण यांच्यात यापूर्वीही वाद झाला होता. त्या पार्श्वभूमीवरच ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कॉलेज कॉर्नर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडून तपासले जात आहेत.
विश्रामबाग पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, गुन्ह्याचे नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: निवडणूक प्रक्रियेचा मोठा अनुभव असलेले सांगली ZP CEO IAS विशाल नरवाडे मैदानात; इचलकरंजीत प्रत्यक्ष पाहणी.
- बैलगाडी शर्यतीला गेलेल्या युवकाची मोटारसायकल चोरी; रेठरेधरण येथील घटना
- दिघंची बसस्थानकाजवळील दुकान फोडले; 1.21 लाखांचा ऐवज लंपास
- सांगली महानगरपालिका भरतीच्या नावाने फसवणूक? सोशल मीडियावरील जाहिराती खोट्या
- होळीच्या रात्री पुणे–बेंगलोर महामार्गावर हिट अँड रन; पेठनाक्याजवळ 55 वर्षीय वेटरचा मृत्यू
- इस्राईल-इराण तणाव; दुबईला गेलेल्या कुपवाडमधील 30–35 पर्यटकांशी संपर्क, सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या हालचाली सुरू
- सांगली मनपाच्या पहिल्या महासभेत मोठा निर्णय; 30 कोटींच्या नाट्यगृहाला मंजुरी, स्थायी समिती गठीत









