सांगली : गुंतवणुकीवर अवघ्या ४५ दिवसांत १२ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून सांगलीतील बहीण-भावाची सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दाम्पत्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश प्रकाश सावंत (रा. जुना कुपवाड रस्ता, गजानन कॉलनी, सांगली) आणि त्यांची बहीण स्नेहल घोरपडे यांची संशयित नितीन शंकर यादव व अश्विनी नितीन यादव (रा. खणभाग, सांगली) या दाम्पत्याशी पूर्वीपासून ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत यादव दाम्पत्याने २०२२ साली “रेवा एंटरप्रायजेस पोर्टफोलिओ” नावाच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जास्त परतावा मिळेल, असे आश्वासन दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार गणेश सावंत यांच्याकडून सुमारे २० लाख रुपये तर त्यांच्या बहिणीकडून ५ लाख रुपये अशी एकूण २५ लाख रुपयांची रक्कम संशयितांनी स्वीकारली. सुरुवातीला विश्वास निर्माण करण्यासाठी काही दिवसांत परतावा म्हणून ५ लाख रुपये दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम व परतावा देण्यात टाळाटाळ सुरू झाल्याचा आरोप आहे.
वारंवार संपर्क साधूनही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बहीण-भावाने सांगली शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित दाम्पत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, जास्त परताव्याचे आमिष दाखवून होणाऱ्या गुंतवणूक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी कोणतीही गुंतवणूक करताना आवश्यक कागदपत्रे, कंपनीची नोंदणी व अधिकृत परवाने तपासावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Sangli Ration Update : जानेवारीपासून रेशन धान्य वाटपात बदल; सांगलीतील लाभार्थ्यांना आता किती धान्य मिळणार?.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










