इस्लामपूर (सांगली) : लग्नाच्या आदल्या रात्री घरी परतत असताना इस्लामपूर बसस्थानकासमोर झालेल्या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. आकाश चंद्रकांत बाबर (वय २७, रा. पेठनाका, ता. वाळवा) असे मृताचे नाव असून, त्याच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाशचा भाऊ व त्याचे मित्र रिल्स बनाविण्यासाठी खांबे मळा परिसरात गेले होते. ते पाहण्यासाठी आकाश मित्रासोबत खांबे मळा परिसरात गेला होता. आकाश आपल्या मित्रासह रिल्स शूटिंग पाहून घरी परतत असताना समोरून आलेल्या मोटारीने (क्र. एमएच ०६ एएफ ४२४७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात आकाशचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र हर्षद बापू सकटे (वय २१, रा. पेठनाका) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धडक दिल्यानंतर मोटारचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. नागरिकांनी वाहनाचा पाठलाग केला, मात्र दत्त टेकडी परिसरात मोटार सोडून चालक पसार झाला. प्रसाद बाबर या नातलगाने इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अपघाताचा तपास सुरू केला आहे.
आकाश खासगी कंपनीत नोकरीस होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर मोठा आघात झाला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर चार महिन्यांत चौघांचा अपघाती मृत्यू झाला असून, चुकीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमुळे सतत अपघात होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
🔴 हेही वाचा 👉 आटपाडीत भरधाव चारचाकी ट्रॉलीत घुसली; दोन ठार, दुचाकीस्वार जखमी.