Sangli News | सांगली : “दोन वर्षांत कवलापूर येथे नागरी विमानतळ पूर्ण करू” असा संकल्प राज्य शासनाने जाहीर करून दोन महिने उलटले आहेत. मात्र प्रत्यक्षात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा पहिला दगडही अजून रचलेला नाही. घोषणा, बैठकांपुरतेच हे विमानतळ सीमित राहणार की प्रत्यक्षात मार्गी लागणार, असा थेट सवाल आता सांगलीतील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ऑक्टोबरमध्ये शासनस्तरावर विमानतळ प्राधिकरणाशी चर्चा, भूसंपादनाबाबत सकारात्मक भूमिका आणि व्हिजिबिलिटी सर्व्हेची घोषणा करण्यात आली होती. मात्र डिसेंबर अखेरपर्यंत कवलापूर परिसरात कोणतेही प्रत्यक्ष सर्वेक्षण, मोजणी किंवा प्रशासकीय हालचाल सुरू झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे “दोन वर्षांचा कालावधी नेमका कधीपासून मोजायचा?” असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भूसंपादनावर सरकारची भूमिका अस्पष्ट
विमानतळासाठी सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन लागणार असल्याचे सांगितले जाते. मात्र आजपर्यंत किती जमीन निश्चित झाली, कोणत्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित होणार, मोबदला किती दिला जाणार आणि त्यासाठी निधी मंजूर झाला आहे का, याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
जमीन अधिग्रहणाचाच आराखडा स्पष्ट नसेल, तर दोन वर्षांत विमानतळ कस पूर्ण होणार? असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत.
व्हिजिबिलिटी सर्व्हे झाला की नाही?
विमानतळ प्राधिकरणाकडून व्हिजिबिलिटी सर्व्हे केला जाणार असल्याची घोषणा झाली होती. मात्र हा सर्व्हे प्रत्यक्षात झाला आहे की नाही, झाला असल्यास त्याचा अहवाल काय सांगतो आणि तो सार्वजनिक कधी केला जाणार, याबाबतही अद्याप स्पष्टता नाही.
अहवालाशिवाय पुढील निर्णय कसे घेतले जात आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
घोषणा की अंमलबजावणी?
कवलापूर विमानतळाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून अधूनमधून पुढे येत आहे. प्रत्येक वेळी आश्वासने दिली जातात; पण निविदा प्रक्रिया, निधी वितरण आणि बांधकामाची ठोस टाइमलाईन कधीच जाहीर होत नाही. यावेळीही केवळ घोषणाच झाल्या असतील, तर नागरिकांचा विश्वास डळमळीत होणे स्वाभाविक आहे.
विकास हवा, पण पारदर्शकतेसह
सांगली जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या दृष्टीने विमानतळ अत्यावश्यक असल्याचे सर्वमान्य आहे. मात्र विकासासाठी केवळ घोषणा नव्हे, तर पारदर्शक कृती अपेक्षित आहे.
नागरिकांचे काही थेट प्रश्न —
- भूसंपादन कधी सुरू होणार?
- निधी मंजूर झाला आहे का?
- निविदा प्रक्रिया कोणत्या टप्प्यात आहे?
- प्रत्यक्ष बांधकामाची निश्चित तारीख काय आहे?
सरकार उत्तर देणार का?
कवलापूर विमानतळाबाबत आता आश्वासनांपेक्षा ठोस कृतीची गरज आहे. “कधी सुरू, कधी पूर्ण” याचे स्पष्ट उत्तर सरकार देणार की पुन्हा एकदा हा प्रकल्प घोषणांच्या फाईलमध्येच अडकून राहणार, हा प्रश्न आज सांगलीतील प्रत्येक जागरूक नागरिक विचारत आहे.
हेही वाचा: संख स्वतंत्र तालुका व्हावा; ग्रामस्थांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू.
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी










