सांगली : हुंड्याच्या कुप्रथेविरोधात समाजमनात परिवर्तन घडवण्यासाठी सांगली जिल्ह्यात ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत हुंडामुक्ती अभियान राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून हे अभियान सुरू करण्यात येत असून, हुंडामुक्त विवाहाला प्रोत्साहन देणाऱ्या कुटुंबांचा जागतिक महिला दिनी (८ मार्च) सन्मान करण्यात येणार आहे.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, २१व्या शतकातही हुंड्यासारखी सामाजिक कुप्रथा अस्तित्वात असून, त्यामुळे महिलांवर मानसिक व शारीरिक छळाचे प्रकार घडत आहेत. विवाह हा व्यवहार ठरण्याऐवजी सन्मान, समानता आणि सुरक्षिततेवर आधारित असावा, या उद्देशाने हे अभियान राबवले जात आहे.
या अभियानांतर्गत अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून तालुकास्तरावर हुंडाप्रथेविरोधी जनजागृती केली जाणार आहे. तसेच १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत विवाह झालेल्या जोडप्यांकडून व त्यांच्या पालकांकडून हुंडा घेतला व दिला नाही याबाबत शपथपूर्वक प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे.
संबंधित प्रतिज्ञापत्र जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे सादर करणे आवश्यक असून, हुंडामुक्त विवाहाचा आदर्श निर्माण करणाऱ्या जोडप्यांचा व कुटुंबियांचा ८ मार्च रोजी प्रशस्तिपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. यासोबतच, या अभियानात विशेष योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा महाराष्ट्र दिनाच्या आसपास विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामस्तरापर्यंत हुंडाप्रथेविरोधी विचार पोहोचेल, तसेच महिलांच्या सन्मान, समानता व सुरक्षिततेची जाणीव समाजात रुजेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा: सांगलीत ७ ते ९ जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










