ईश्वरपूर (ता. वाळवा) : पेठ परिसरात महामार्गालगत असलेल्या एका खासगी कंपनीत सेप्टिक टँकची साफसफाई करताना झालेल्या भीषण दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून, सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेत जखमी झालेल्या विशाल मारुती चौगुले (२४, ईश्वरपूर), केशव आनंदा साळुंखे (४५, निगडी, ता. शिराळा), हेमंत शंकर धनवडे (२७, ओझर्डे, ता. वाळवा) आणि सुनील आनंदा पवार (२९, रेठरे धरण, ता. वाळवा) यांच्यावर ईश्वरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तर महादेव रामचंद्र कदम (४०, महादेववाडी) यांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीतही सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या दुर्घटनेत विशाल सुभाष जाधव (२६), सचिन तानाजी चव्हाण (३९) (दोघे रा. बेघर वसाहत, ईश्वरपूर) आणि सागर रंगराव माळी (३३, गोळेवाडी, पेठ) यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पेठ येथील एका खासगी कंपनीच्या आवारात सेप्टिक टँकची साफसफाई सुरू होती. सुमारे आठ फूट खोल असलेल्या टाकीत खासगी ठेकेदाराकडील कामगार शिडीच्या सहाय्याने उतरून मैला बाहेर काढत होते. टाकीत साचलेल्या विषारी वायूमुळे आणि प्राणवायूच्या कमतरतेमुळे एकामागून एक कामगारांना चक्कर येऊन ते टाकीत कोसळले. मदतीसाठी धावून आलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनाही चक्कर येऊन तेही टाकीत पडले.
सर्वांना तातडीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी मृतांचा अन्नांश (व्हिसेरा) तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला असून ईश्वरपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेत कामगारांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक संरक्षण साधने उपलब्ध नव्हती का, याबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.
मृतांपैकी विशाल जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई-वडील असा परिवार आहे. सचिन चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन अल्पवयीन मुले व आई असा परिवार आहे तर सागर माळी हा अविवाहित असून मृतांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे स्थानिकांनी सांगितले.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









