सांगली : सांगली महापालिकेच्या 78 जागांसाठी सुरू असलेल्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सोमवारी मोठा प्रतिसाद मिळाला. एकाच दिवसात 245 अर्ज दाखल झाले असून, सोमवारअखेर एकूण 270 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची अधिकृत माहिती आहे. मंगळवार, दि. 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असून दुपारी 3 वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
निवडणूक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच दिवसांत एकूण 2,548 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. सोमवारी 563 अर्जांची विक्री झाल्याने ही आतापर्यंतची सर्वाधिक एकदिवसीय विक्री ठरली आहे. अंतिम दिवशी आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सोमवारी सर्व सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांच्या परिसरात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत तर काहींनी मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना, शिवसेना (उबाठा) यांच्यासह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत.
आकडेवारीनुसार, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक 5 (प्रभाग 12, 13, 14 व 16) येथे सर्वाधिक 462 अर्जांची विक्री झाली आहे. त्याखालोखाल कार्यालय क्रमांक 4 मध्ये 435, कार्यालय क्रमांक 2 मध्ये 434, कार्यालय क्रमांक 6 मध्ये 412, कार्यालय क्रमांक 1 मध्ये 410, तर कार्यालय क्रमांक 3 मध्ये 395 अर्जांची विक्री झाली आहे.
अर्ज दाखल करताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे, प्रतिज्ञापत्रे, जात पडताळणी प्रमाणपत्र (लागू असल्यास) आणि अनामत रकमेची पावती पूर्ण व अचूक स्वरूपात सादर करणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अपूर्ण किंवा त्रुटी असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, अंतिम दिवशी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची घाई टाळून वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा: Sangli Municipal Election : भाजपविरोधात महाआघाडी; १८ प्रभाग निश्चित, २ प्रभागांत तिढा.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










