सांगली : वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा ही केवळ प्रशासकीय उपक्रम न राहता समाजव्यापी चळवळ म्हणून उभी राहणे गरजेचे आहे, असे मत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी व्यक्त केले. ते सांगली येथे आयोजित 37 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान 2026 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, सांगली आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले की, दर्जेदार रस्ते आणि विविध माध्यमांतून जनजागृती करूनही अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने जीवितहानीसह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर टाळणे, वेगमर्यादेचे पालन करणे, हेल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करणे या छोट्या-छोट्या सवयी अपघात टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनीही वाहनचालकांनी वाहतूक नियम गांभीर्याने पाळण्याचे आवाहन केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या अभियानांतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली. विश्रामबाग चौक, पुष्कराज चौक, राम मंदिर चौक, आमराई, कॉलेज कॉर्नर मार्गे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय येथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीमध्ये पोलीस दल, आरटीओ कर्मचारी तसेच ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.
हेही वाचा: सांगली जिल्ह्यातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश; जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










