Maharashtra Weather News | पुणे : भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी महत्त्वाचा हवामान अंदाज वर्तवला आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये जादा पावसाची नोंद होऊ शकते.
आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी सांगितले की, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून माघार घेण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे मध्य भारतासह महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार आहे.
हवामान खात्याच्या नकाशानुसार महाराष्ट्र ब्ल्यू झोन मध्ये आहे, ज्याचा अर्थ सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. काही भागांमध्ये, विशेषतः कोकण-गोवा किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतिरिक्त पावसाची शक्यता आहे.
तथापि, पुण्यातील वरिष्ठ वैज्ञानिकांनी स्पष्ट केले की जास्त पावसाचा अंदाज म्हणजे संपूर्ण महिनाभर सलग पाऊस असा नाही. नवीन हवामान प्रणाली तयार झाल्यावरच पावसाचे प्रमाण ठरणार आहे. पुढील १५ दिवसांत दोन प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे.
पुण्यात दसऱ्याला हलका पाऊस?
आयएमडी पुणेचे वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, १-२ ऑक्टोबरदरम्यान पुण्यात हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी (२ ऑक्टोबर) पुणे शहरात हलका पाऊस होऊ शकतो.
हेही वाचा: मिरज तालुक्यात घरफोडी; चाकूच्या धाकाने महिलेचे दागिने लुटले.