मिरज | 07 डिसेंबर 2025 : मिरज मार्केट परिसरात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महापालिका पथकाला सोमवारी रात्री गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागले. कारवाईदरम्यान खोकेमालकाने आत्मदहनाचा प्रयत्न करताच परिसरात एकच तणाव निर्माण झाला, अखेर संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी महापालिकेने कारवाई स्थगित करत पथक माघारी घेतले.
महापालिकेचे पथक जेसीबीसह अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधित खोक्याजवळ पोहोचले असता, खोकेमालक संतापाच्या भरात आला. त्याने स्वतःच्या मुलाच्या अंगावर आणि खोक्यावर पेट्रोल ओतले आणि “काडेपेटी द्या” असा आक्रोश करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहताच उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला.
परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका पथकाने तात्काळ कारवाई थांबवत माघारी जाण्याचा निर्णय घेतला. काही काळ मार्केट परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पूर्वीही कारवाई; तरीही खोका न हटवल्याने आजचा प्रकार
महापालिकेने यापूर्वी 21 नोव्हेंबर रोजी मार्केट परिसरातील कपड्यांच्या 13 दुकानांचे अतिक्रमण हटविले होते. संबंधित पानपट्टीचे खोके हटविण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत खोके न हटवल्याने कारवाई निश्चित करण्यात आली होती.
या घटनेनंतर सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांनी संबंधित खोकेमालकाला पुन्हा एकदा आजपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेची नोंद संबंधित यंत्रणेकडून घेण्यात येत असून परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









