Sangli Municipal Corporation Election | सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. घटक पक्षांमधील समन्वयाचा अभाव आणि वेगवेगळ्या दिशेने सुरू असलेल्या हालचालींमुळे आघाडीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांची निवडणूक तयारी अद्याप संथ गतीने सुरू असताना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील मात्र राजकीय पातळीवर सक्रिय असून स्थानिक पातळीवर मजबूत बांधणी करत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र आघाडी म्हणून एकत्रित रणनीती अद्याप समोर आलेली नाही.
अलीकडे पार पडलेल्या सहा नगरपालिका निवडणुकांत महाविकास आघाडीचे एकसंध नेतृत्व किंवा ठोस ऐक्य दिसून आले नाही. याचा परिणाम आता येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आघाडी एकत्र राहील का, याबाबत कार्यकर्त्यांमध्येच संभ्रम वाढत चालला आहे.
काँग्रेसमध्ये शहर-जिल्हाध्यक्ष पदावरून सुरू असलेले अंतर्गत मतभेद अजूनही मिटलेले नाहीत. खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदम यांनी निवडणूक तयारीला अपेक्षित वेग न दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे, भाजपने निवडणुकीसाठी आक्रमक रणनीती आखली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक एका छताखाली आले नाहीत, तर सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत महाविकास आघाडीचे अस्तित्वच अडचणीत येऊ शकते, अशी चिंता आघाडीतील पदाधिकारी उघडपणे व्यक्त करत आहेत.
हेही वाचा: सांगली महापालिका निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










