Sangli News | सांगली : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करताच सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांमध्ये बैठकांचा आणि रणनीती आखण्याचा सिलसिला सुरू झाला असून, पक्षप्रवेशाचे राजकारणही रंगात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगली दौऱ्यामुळे सोमवारी शहरात सर्वपक्षीय नेत्यांची मोठी गर्दी होती. कार्यक्रम आटोपताच प्रत्येक पक्षाने अंतर्गत बैठका घेऊन निवडणूक तयारीला गती दिली. काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जयंत पाटील यांनी एकत्र बैठक घेऊन महाविकास आघाडीच्या संभाव्य रचनेबाबत प्राथमिक चर्चा केली. जागावाटपावर अद्याप सविस्तर चर्चा झालेली नसली, तरी आघाडी म्हणूनच निवडणूक लढवण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे संकेत त्यांनी दिले.
दुसरीकडे भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये बैठकांची चर्चा सुरू झाली आहे. भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आधीच घेतल्या असून, उर्वरित घटक पक्षांच्या मुलाखती पूर्ण झाल्यानंतर महायुतीतील जागावाटपावर चर्चा होणार असल्याचे समजते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक राहिल्याने, पुढील दोन दिवसांत महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हींकडून महत्त्वपूर्ण बैठका होण्याची शक्यता आहे.
पक्षप्रवेशाचे राजकारण तापले
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अनेकांना उमेदवारीबाबत खात्री वाटत नाही. याच पार्श्वभूमीवर काही इच्छुक नेते पक्षप्रवेशाच्या हालचाली करत असल्याचे चित्र आहे. सोमवारी सकाळी मिरज महाविकास आघाडीतील काही माजी नगरसेवकांनी पुण्यात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जागावाटपावर अजूनही तिढा
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून अद्याप एकमत झालेले नाही. प्रत्येक घटक पक्षाने अपेक्षित जागांची संख्या स्पष्ट केल्यामुळे तिढा सोडवण्याचे आव्हान वरिष्ठ नेत्यांसमोर आहे. महाविकास आघाडीत हा निर्णय विशाल पाटील, जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली होण्याची शक्यता आहे, तर महायुतीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: Sangli Weather Update: सांगलीत गारठा कायम; थंडीची लाट ओसरली तरी हवेतील गारवा टिकून.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










