शिराळा : शिराळा तालुक्यातील औंढी (ता. शिराळा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी बबन पाटील यांच्या मालकीच्या तीन शेळ्या व एक बोकड ठार झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवार, दि. 26 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बबन पाटील यांनी आपल्या शेतात उभारलेल्या शेडमध्ये शेळ्या व बोकड बांधले होते. रात्रीच्या वेळेत बिबट्याने शेडमध्ये प्रवेश करून पशुधनावर हल्ला केला. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच वनपाल अनिल वाजे आणि वनरक्षक दत्तात्रय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान, शिराळा तालुक्यातील उत्तर भागात बिबट्यांचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. पाडळी, पाडळीवाडी, खेड बेलदारवाडी, भटवाडी, निगडी, शिरशी, गिरजवडे, करमाळे, औंढी तसेच एमआयडीसी परिसरात बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ऊसतोड सुरू असल्याने शेतातील फड मोकळे होत असून, त्यामुळे वन्यप्राणी नागरी वस्तीच्या दिशेने येत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी शिवरवाडी परिसरात मादी जातीचा बिबट्या ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जेरबंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही परिसरात बिबट्यांचा वावर कायम असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
बिबट्यांचे हल्ले टाळण्यासाठी वन विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, तसेच नागरी वस्तीकडे येणारे वन्यप्राणी रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा: सांगली महापालिका निवडणूक : महायुतीच गणित चुकतय का? राष्ट्रवादी बाहेर, शिंदेसेनेबाबत सस्पेन्स.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










