इचलकरंजी (जि. कोल्हापूर) : इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक निरीक्षक तथा सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी बुधवारी इचलकरंजी शहरास प्रत्यक्ष भेट देत संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा सखोल आढावा घेतला.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आय. ए. एस. श्री. विशाल नरवाडे यांची मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून, तर जीवन गलांडे यांची सहाय्यक निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असलेल्या चारही प्रभाग समिती कार्यालयांना भेट देत त्यांनी छाननी प्रक्रिया, प्रशासनाची तयारी तसेच कार्यपद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केली.
प्रशासकीय शिस्त आणि जबाबदारीवर भर
मुख्य निवडणूक निरीक्षकांनी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान मनुष्यबळ नियोजन, तांत्रिक सज्जता आणि कामकाजातील पारदर्शकता यांचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या. त्यानंतर निवडणूक अधिकारी तथा आयुक्त पल्लवी पाटील यांच्यासह नियंत्रण अधिकारी, नोडल अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली.
या बैठकीत निवडणूक प्रक्रियेसाठी नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, तसेच आदर्श आचारसंहितेच्या भंगासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर भरारी पथकांनी तातडीने आणि निष्पक्ष कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
अनुभवसंपन्न अधिकाऱ्याची प्रभावी उपस्थिती
२०२० बॅचचे आयएएस अधिकारी असलेले विशाल नरवाडे यांनी यापूर्वी भारतीय पोलीस सेवेत (IPS) कार्य केले असून, त्यांना विविध स्तरांवरील निवडणूक प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०१९ व २०२४, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ या प्रक्रियांमध्ये त्यांनी प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
या अनुभवाच्या जोरावर इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश या दौऱ्यातून देण्यात आला.
हेही वाचा: मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









