शिराळा : पेठ–शिराळा मार्गावरील गोळेवाडी परिसरात बिबट्याने दुचाकीवर झडप घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेल्या अर्चना प्रमोद पाटील (वय ३४, रा. रेठरेधरण) या जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद पाटील, अर्चना पाटील आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा हे तिघे पेठकडून दुचाकीवरून रेठरेधरणकडे जात होते. गोळेवाडी येथील जनाई गार्डनजवळ पोहोचताच जांभुळवाडीच्या दिशेने आलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दुचाकीवर झडप घातली.
या हल्ल्यात बिबट्याचा पंजा अर्चना पाटील यांच्या उजव्या पायाला लागला असून, दुचाकी असंतुलित झाल्याने त्या खाली पडल्या. पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला असून, पायाला बिबट्याच्या नखांच्या जखमा झाल्या आहेत. दरम्यान, वाहनांच्या प्रकाशझोतात बिबट्या जवळच्या शेतात पसार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमी महिलेला पेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली होती. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी केली. काही महिन्यांपासून जांभुळवाडी व आसपासच्या भागात बिबट्याचा वावर असल्याची माहिती नागरिकांकडून दिली जात आहे. याआधीही या परिसरात वन्यप्राण्यांच्या हालचालींच्या घटना समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा: स्वामित्व योजनेअंतर्गत ४२३ गावांत ड्रोन सर्वेक्षण पूर्ण; जमीनधारकांना मालकीची नोंद मिळण्याचा मार्ग मोकळा.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










