सांगली : सांगली शहरातील शामरावनगर परिसरात शुक्रवारी रात्री एका तरुणाचा चाकूहल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.
मृत तरुणाचे नाव चैतन्य आप्पासाहेब तांदळे (वय 17, रा. रामनगर, कोल्हापूर रोड, सांगली) असे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चैतन्य हा शुक्रवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास शामरावनगर भागात एका मित्रासोबत जात असताना, दबा धरून बसलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर हल्ला केला.
हल्ल्याच्या वेळी चैतन्यसोबत असलेला अल्पवयीन मित्र घटनास्थळावरून पळून गेला. चैतन्य गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पूर्ववैमनस्याचा संशय; तपास सुरू
पोलिस तपासात चैतन्य आणि संशयितांमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची माहिती समोर आली असून, त्याच पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तिघा संशयितांची ओळख पटवण्यात आली असून, त्यांना ताब्यात घेण्यासाठी सांगली शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची पथके कार्यरत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
निवडणूक काळात घडलेली घटना
सांगली–मिरज–कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक पोलीस बंदोबस्त असताना ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले असून, गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून, अधिकृत तपासानंतरच पुढील माहिती स्पष्ट होणार आहे.
- Sangli Civic : मतदार यादीत तुमचं नाव आहे का? मतदान कोणत्या बूथवर करायच — मोबाईलवरून 2 मिनिटांत शोधण्याची सोपी पद्धत
- NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ ईश्वरपूरात विद्यार्थ्यांचा मोर्चा; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
- सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मोटारीचा अपघात; दुचाकीस्वार जखमी
- कर्जमाफीसाठी मृत शेतकऱ्यांच्या वारसांनी तातडीने KYC पूर्ण करा; सांगली प्रशासनाचे आवाहन
- Sangli Jobs: मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवकांसाठी शासनाचा विशेष उपक्रम
- सांगली-सातारा विधान परिषदेत महायुतीचा दणदणीत विजय; धैर्यशील कदम 301 मतांनी विजयी










