सांगली : सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे पणतू हर्षवर्धन पाटील हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले असून, त्यांनी थेट नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल करत राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी त्यांनी महापालिका स्तरावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
हर्षवर्धन पाटील हे उच्च शिक्षणासाठी परदेशात गेले होते. त्यांनी ब्रिटनमधील मँचेस्टर मेट्रोपॉलिटन विद्यापीठातून ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. परदेशात करिअरच्या संधी उपलब्ध असतानाही त्यांनी सांगलीतच राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘थेट नागरिकांच्या प्रश्नांपासून सुरुवात’
हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितले की, मोठ्या पदांपेक्षा स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, वीज, स्वच्छता आणि शिक्षणाशी संबंधित समस्या थेट नागरिकांशी संवाद साधून जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.
सामाजिक कामातून राजकारणात प्रवेश
कोविड काळात आरोग्य सुविधा, उपचार मिळवण्यासाठी नागरिकांना मदत केल्याने सामाजिक कामाशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क आला. त्यानंतर स्थानिक पातळीवर काम करताना नागरिकांच्या अडचणी त्यांनी जवळून पहिल्या. युवकांमधील व्यसनाधीनतेचा प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि मूलभूत नागरी सुविधांचा अभाव हे मुद्दे त्यांनी प्राधान्याने मांडले आहेत.
राजकीय पार्श्वभूमी
हर्षवर्धन पाटील यांचे वडील प्रतिक पाटील हे केंद्रातील यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. आजोबा प्रकाशबापू पाटील यांनी दीर्घकाळ सांगलीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे, तर काका विशाल पाटील हे सध्याचे सांगलीचे खासदार आहेत. मात्र, या पार्श्वभूमीपेक्षा स्वतःच्या कामावर आणि स्थानिक प्रश्नांवर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पहिली राजकीय चाचणी
महापालिका निवडणूक ही हर्षवर्धन पाटील यांची पहिली अधिकृत राजकीय परीक्षा मानली जात असून, अनुभवी माजी नगरसेवक आणि विविध पक्षांचे उमेदवार त्यांच्या विरोधात असल्याने ही लढत आव्हानात्मक ठरणार आहे. युवक उमेदवार म्हणून ते मतदारांचा विश्वास किती संपादन करू शकतात, याकडे सांगलीतील सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: सांगलीतील शामरावनगर परिसरात तरुणाचा खून; पूर्ववैमनस्याचा संशय; पोलीस तपास सुरू.
- मिरजमध्ये 17 एप्रिलला विशेष सरकारी शिबीर; सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी
- सांगलीत डॉ. बाबासाहेबांचे जगातील सर्वात मोठे, पहिले रियलॅस्टिक मल्टी-कलर स्ट्रिंग आर्ट
- जतजवळ ट्रेलरची दुचाकीला धडक; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू
- सांगलीतील 152 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना बदलणार? 13 एप्रिलपर्यंत हरकती नोंदवता येणार
- जत : उमदीजवळ भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत कार चालकाचा मृत्यू, सहा जखमी
- सांगलीची रोजगार योजनेत मोठी झेप; 1375 जणांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरी










