सांगलीत 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; देश-जिल्हा वैभवशाली बनविण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

Sangli Today Desk
Sangli Today Desk
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले...
77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथील पोलीस संचलन मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मार्गदर्शन; मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण व परेड. | फोटो : Sangli Today

सांगली : देश आणि जिल्ह्याला वैभवशाली व संपन्न बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कटिबद्ध राहावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली येथील पोलीस संचलन मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात ते बोलत होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी संविधान, लोकशाही मूल्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित केले.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाला एक सुसंघटित लोकशाही व्यवस्था देण्याची मोठी जबाबदारी होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार झालेल्या संविधानामुळे भारताला मजबूत लोकशाहीचा पाया मिळाला. 26 जानेवारी हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा दिवस आहे. अधिकारांसोबतच कर्तव्यांची जाणीव ठेवणे, कायद्याचा सन्मान करणे आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य समारंभात राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर सांगली पोलीस दल, महिला पोलीस पथक, होमगार्ड, अग्निशमन दल, दंगल विरोधी पथक, श्वान पथक, निर्भया पथक वाहन, बॉम्ब शोधक व नाशक पथक अशा विविध पथकांनी संचलनात सहभाग घेतला. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थिनींच्या कराटे प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिकही उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात आला. सैन्य सेवेत शहीद झालेल्या खानापूर येथील नायब सुभेदार जयसिंग उर्फ बाबा शंकर भगत यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली. तसेच आपत्ती व्यवस्थापन, क्रीडा, शिक्षण, सामाजिक कार्य आणि पोलीस विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली असून, सांगली जिल्हा नशामुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हेही वाचा: सांगली : मयूर नर्सरी आगीतील मृत्यू प्रकरणात संशय वाढला; पती अजूनही पसार, पाच पथकांकडून शोधमोहीम सुरु.

Share This Article
सांगली टुडे डेस्क ही Sangli Today News Network ची अधिकृत संपादकीय टीम आहे. आमच्या या टीममध्ये पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील १० वर्षांहून अधिक अनुभव असलेले तज्ज्ञ संपादक आणि वार्ताहरांचा समावेश आहे.आम्ही सांगली जिल्ह्यातील राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि सार्वजनिक हिताच्या बातम्यांचे अचूक आणि जबाबदार वार्तांकन करण्यासाठी कटिबद्ध आहोत. प्रत्येक बातमी अधिकृत स्रोत, स्थानिक प्रशासन आणि प्रत्यक्ष घटनास्थळावरील माहितीनुसार Multi-level Fact-Checking प्रक्रियेतून पडताळूनच प्रकाशित केली जाते. सांगली जिल्ह्याला केंद्रस्थानी ठेवून शेती, शिक्षण, आरोग्य, कायदा व सुव्यवस्था आणि नागरिक प्रश्नांवर 'Hyper-local' रिपोर्टिंग करणे हेच आमचे प्रमुख ध्येय आहे.संपर्क आणि पारदर्शकता: संपादकीय कार्यालय: 3B, Midc Kupwad Rd, Vidyanagar, Vishrambag, Sangli, Sangli Miraj Kupwad, Maharashtra 416416. ईमेल: hellosanglitoday@gmail.com
WhatsApp चॅनेल फॉलो करा