सांगली : राज्यात गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावर तोडगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
पत्रात जयंती पाटील यांनी नमूद केले की, मुसळधार पावसामुळे शेतातील पिके पाण्यात गेली आणि अनेक शेतकऱ्यांची घरे देखील बाधित झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. महाराष्ट्रातील तब्बल 30 जिल्ह्यांतील शेती पिकांचे नुकसान झाले असून, राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, पंचनामे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. तसेच पीक विम्याची रक्कम तातडीने वितरित करावी आणि बँकांकडून वसुलीची कारवाई थांबवावी, अशीही मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
जयंत पाटील यांनी सरकारने फक्त पिकांच्या नुकसानीवर मर्यादित न राहता जनावरे, घरे आणि गोठ्यांवरील नुकसानीसाठी देखील मदत जाहीर करावी, असे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: पडळकरांच्या वक्तव्याविरोधात २२ सप्टेंबरला निषेध मोर्चा; राज्यभरात संतापाची लाट उसळली.