सांगली : तासगाव तालुक्यातील येळावी गावातील एका तरुणाची ऑनलाईन जॉबच्या नावाखाली तब्बल १६ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी पीडिताने तासगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फिर्याद दाखल केली असून, अधिक तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय सुमित मोहन यादव याला मोबाईलवरील इंस्टाग्रामवर एका अज्ञात व्यक्तीने वर्क फ्रॉम होम जॉबची लिंक पाठवली. घरबसल्या जास्त पैसे मिळतील, असा विश्वास देऊन त्याच्याशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क साधला गेला. बोनस देण्याचे आमिष दाखवत संशयिताने सुमितकडून १० ते १८ मार्च २०२५ या कालावधीत हप्त्यांमध्ये मिळून १६ लाख १२ हजार रुपयांची रक्कम आपल्या खात्यावर घेतली.
काही दिवसांनी विश्वास बसावा म्हणून फसवणूक करणाऱ्याने सुमितला सुमारे ६६ हजार रुपये परत पाठवले. मात्र त्यानंतर उर्वरित रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू झाली. शेवटी ती लिंक बंद करण्यात आली आणि संपर्क क्रमांकही बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुमित यादव याने पोलिस ठाण्यात धाव घेतली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तासगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: जयंत पाटील समर्थकांचा संताप – २२ सप्टेंबरला सांगलीत मोठ आंदोलन?.