तासगाव : तासगाव तालुक्यातील बलगवडे गावात प्रस्तावित सोलर प्रकल्पासाठी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, याच पार्श्वभूमीवर ग्रामसभेत आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
सोलर प्रकल्पासाठी गावातील गायरान क्षेत्रात असणारी हजारो झाडे तोडण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. पर्यावरणाला हानी होणार असल्याने या प्रकल्पाला गावाकऱ्यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. याबाबत प्रशासनाकडे निवेदने देऊनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
या मुद्द्यावरून यापूर्वी गावात बेमुदत उपोषण सुद्धा करण्यात आले होते. त्या आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत प्रकल्पासाठी जागा बदलण्याबाबत एकमत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पोलिस बंदोबस्तात वृक्षतोड झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण होऊन असंतोष वाढला आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडून तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या बैठकीवरच ग्रामस्थांनी बहिष्कार घातल्याने केवळ मोजकेच प्रतिनिधी बैठकीस उपस्थित राहिले.
ग्रामस्थांनी ग्रामसभेत सर्वानुमते मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली असून, प्रशासनाच्या आश्वासनांवर आता विश्वास राहिला नाही, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर प्रशासन पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










