मुंबई / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. नवीन कामगार नोंदणी, नूतनीकरण आणि विविध कल्याणकारी योजनांच्या दाव्यांसाठी प्रत्यक्ष भेटीच्या तारखांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर या निर्णयाची तातडीची सूचना जारी करण्यात आली असून, यामुळे तांत्रिक अडचणी किंवा तारखा निघून गेल्यामुळे प्रलंबित राहिलेल्या कामगारांची मोठी चिंता दूर झाली आहे.
बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर संबंधित तालुका किंवा जिल्हा स्तरावरील कार्यालयात कागदपत्रांच्या प्रत्यक्ष पडताळणीसाठी भेट घेणे अनिवार्य असते. मात्र, अर्जांची वाढती संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे अनेक कामगारांना वेळेत भेटीची तारीख मिळत नव्हती, तर काहींची नियोजित तारीख निघून गेल्याने त्यांचे अर्ज प्रलंबित पडले होते. या पार्श्वभूमीवर मंडळाने नोंदणी, वार्षिक नूतनीकरण आणि दाव्यांच्या पडताळणीसाठी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे बांधकाम कामगारांना गृहपयोगी भांडी संच, सुरक्षा संच, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, विवाह अर्थसहाय्य, वैद्यकीय उपचार मदत तसेच घरकुल योजनेसारख्या विविध लाभांचे दावे सादर करणे अधिक सोपे होणार आहे. ज्या कामगारांची नोंदणी मुदत संपली आहे किंवा ज्यांच्या अर्जावर अद्याप प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, त्यांना या वाढीव मुदतीचा लाभ घेता येणार आहे.
संबंधित कामगारांनी कोणत्याही मध्यस्थांवर किंवा एजंटवर अवलंबून न राहता स्वतः मंडळाच्या mahabocw.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी आणि उपलब्ध तारखेनुसार आवश्यक मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या वाढीव मुदतीमुळे राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील हजारो बांधकाम कामगार कुटुंबांना हक्काचा आर्थिक लाभ वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा: सराफा बाजारातील ताजे दर जाहीर; जाणून घ्या महाराष्ट्र आणि सांगलीतील आजचा सोन्याचा भाव.
📢 बांधकाम कामगार योजनेसह महाराष्ट्रातील ईतर शासकीय योजना, नवीन शासन निर्णय (GR), आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी Sangli Today ला Google वर प्राधान्य असलेले स्रोत म्हणून जोडा.👇



