मुंबई / सांगली (सांगली टुडे वृत्तसेवा): दिवाळी सणाचा उत्साह, सलग सुट्ट्यांची पर्वणी आणि गावी जाण्या-येण्याच्या प्रवासासाठी राज्यातील प्रवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ‘लालपरी’ला यंदा भरभरून पसंती दिली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या १६ दिवसांत एसटी महामंडळाने तब्बल ५४८ कोटी २२ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवले असून, दररोज सरासरी ३४ कोटी २५ लाख रुपयांची कमाई नोंदवली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबर रोजी परतीच्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे एसटीने एकाच दिवसात ४६ कोटी ५३ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळवण्याचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीतील सक्त नियम तसेच दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या उत्पन्नावर काहीसा प्रतिकूल परिणाम झाला होता. मात्र, नोव्हेंबर महिन्यात दिवाळी सण, सलग सुट्ट्या, प्रवाशांची वाढलेली संख्या आणि महिला सन्मान योजनेच्या अंमलबजावणीत देण्यात आलेली शिथिलता यामुळे एसटीच्या उत्पन्नाला मोठी चालना मिळाली आहे.
हेही वाचा: बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; नोंदणी, नूतनीकरण आणि योजनांच्या दाव्यांसाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ.
यंदाच्या दिवाळी हंगामातील आणखी एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे दरवर्षी गर्दीच्या हंगामात आकारली जाणारी हंगामी भाडेवाढ यंदा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे सणासुदीच्या काळातही प्रवाशांना नेहमीच्याच तिकीट दरात प्रवास करता आला असून, खासगी वाहतुकीच्या तुलनेत सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय म्हणून एसटीने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे.
एसटीच्या या विक्रमी कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी राज्यातील तमाम प्रवाशांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तसेच, सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या एसटी महामंडळातील सर्व अधिकारी, कर्मचारी, चालक आणि वाहक यांचेही त्यांनी विशेष अभिनंदन केले असून प्रवाशांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच एसटीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाल्याचे प्रतिपादन केले आहे.
हेही वाचा: मुंबई ते सांगली आणि बंगळुरू प्रवास होणार अतिजलद; नव्या महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर.



