इस्लामपूर (सांगली): रविवारी दुपारी इस्लामपूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे आठवडा बाजारात हाहाकार माजला. जयहिंद व अंबिका देवालय परिसरात भरलेल्या बाजारात गटारीतील पाणी रस्त्यावर आले आणि पाण्यात टोमॅटो, भेंडी, दोडका, वांगी यांसह मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाहून गेला. त्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
शहरातील मुख्य भाजी मार्केटच्या इमारतिचे बांधकाम सुरू असल्याने मागील महिनाभरापासून गुरुवार व रविवारचा आठवडा बाजार जयहिंद चित्रमंदिर व अंबिका मंदिर परिसरातील रस्त्यांवर भरवला जात आहे. मात्र हा परिसर उतारावर असल्याने आझाद चौक, डांगे चौक आणि तहसील कचेरी चौक येथील पाणी थेट बाजार परिसरात ओसंडून वाहते. रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हीच परिस्थिती निर्माण झाली आणि गटारे तुंबल्याने रस्त्यावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू झाला. परिणामी शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळांचा माल पाण्यात वाहून गेला.
या घटनेमुळे शेतकरी आणि व्यापारी मोठ्या प्रमाणात नाराज झाले. पावसामुळे नुकसान झालेल्या विक्रेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तहसील कार्यालय परिसरातील मूळ जागी पुन्हा आपला माल लावला. पालिका प्रशासनाकडे या गंभीर समस्येवर कोणताही ठोस उपाय नाही अशी टीका व्यापाऱ्यांनी केली.
🔴 हेही वाचा 👉 रुग्णालयातून पळालेल्या तरुणाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू; आत्महत्या की हत्या, तपास सुरू.