Palus Accident | सांगली : पलूस-कुंडल महामार्गावर झालेल्या तिहेरी भीषण अपघातात एका 17 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी रात्री शिवशारदा हॉटेलजवळ घडला.
मृत युवकाचे नाव ओंकार प्रकाश शिंदे (वय 17, रा. पलूस एमआयडीसी) असे असून, तो नवीन दुचाकीवरून फेरफटका मारण्यासाठी गेलेला होता. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये राजेश शंकर जाधव (वय 50, रा. येळावी, सध्या रा. लक्ष्मी रेसिडन्सी, पलूस) यांचा समावेश आहे. त्यांच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच समोरून येणारे अतिष शिखरे व त्यांची पत्नी कोमल शिखरे किरकोळ जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, प्रदीप भिसे (वय 18, रा. पलूस एमआयडीसी) हा आपल्या नव्या दुचाकीवरून वेगाने जात असताना जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भिसे याच्या दुचाकीवर मागे बसलेला ओंकार शिंदे रस्त्यावर फेकला गेला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, झालेल्या अपघातात तिन्ही दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल केले.
हेही वाचा: मिरजेत तरुणावर धारदार शस्त्रांनी हल्ला, प्रकृती चिंताजनक.