सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील माळी यांच्यावर मंगळवारी रात्री चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात माळी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुनील माळी हे मंगळवारी सायंकाळी कार्यालयीन कामकाज आटोपून आपल्या निवासस्थानी परतले होते. रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घरासमोरच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात चाकू त्यांच्या छातीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर तातडीने त्यांना टिंबर एरिया परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्यावर दुसऱ्या एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला असून घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी एक संशयित फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके रवाना करण्यात आली आहेत.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सुनील माळी यांचा काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. या पूर्वीच्या वादातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची नोंद असून, त्या घटनेचा आणि सद्य हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.
सुनील माळी हे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याने या हल्ल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, प्रशासन आणि पोलिस यंत्रणेकडून घटनेचा गांभीर्याने तपास सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि आरोपींचा सहभाग तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या ‘गटनेते’पदी संदीप सुरेश आवटी यांची नियुक्ती.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










