इस्लामपूर : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या एका जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. खोट्या कागदपत्रांचा वापर करून बोगस दस्त तयार केल्याच्या आरोपावरून जत येथील सहायक निबंधक अमोल डफळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे सुमारे 41 लाख रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून जिल्ह्यात या घटनेने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्च 2023 रोजी नेर्ले गावातील महामार्गालगतच्या तीन एकर जमिनीचा खरेदीदस्त करण्यात आला होता. हा व्यवहार धीरज पाटील आणि विजय वराहपालन व उत्पादक सहकारी सोसायटी लि., नेर्ले यांच्या नावाने झाला. संबंधित दस्तामध्ये नमूद करण्यात आलेले बाजारमूल्य 41 लाख 10 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे नोंद आहे.
या व्यवहाराबाबत 12 ऑगस्ट 2024 रोजी संभाजी ब्रिगेडचे सुयोग औंधकर यांनी जिल्हा निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यांनी आपल्या तक्रारीत तत्कालीन सहायक निबंधक अमोल डफळे यांनी खरेदीदार आणि साक्षीदारांसोबत संगनमत करून खोटा लिलाव दाखवला, तसेच बनावट अभिलेख तयार करून शासनाची फसवणूक केली, असे गंभीर आरोप केले.
या तक्रारीनंतर जिल्हा निबंधक कार्यालयाने चौकशी सुरू केली. त्यामध्ये दस्तातील लिलाव प्रक्रिया प्रत्यक्षात झालेली नसल्याचे समोर आले. दस्तातील काही पानांवर पाच जणांच्या उपस्थितीत जाहीर लिलाव झाल्याचा उल्लेख असला, तरी प्रत्यक्षात संबंधित नागरिकांनी लिलावात बोली लावली नसल्याचे लेखी निवेदन दिले. तसेच अहवालात खोटे मुद्दे समाविष्ट केल्याचेही उघड झाले.
या निष्कर्षांनंतर सहायक जिल्हा निबंधक यशवंत रोकडे यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार अमोल डफळे यांच्याविरोधात फिर्याद दाखल केली. इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाने सांगली जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा: सांगलीसह महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांत २० सप्टेंबरला मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा.