Sangli Rain News | सांगली : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी पावसाचा जोर कमी-जास्त होत असला तरी जनजीवन विस्कळीत झाले आहे.
शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. भुईमूग, उडीद, सोयाबीन या पिकांचे तसेच केळी, डाळिंब आणि पेरू यांसारख्या फळपिकांचेही नुकसान झाले आहे. ग्रामीण भागात अनेक शेतजमिनींमध्ये पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
शहर आणि गावातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. रस्ते आणि गटारे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हवामान विभागाने येत्या काही तासांत अजून पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
मंत्रालयाकडून जारी केलेल्या सतर्कतेच्या संदेशानुसार, सांगली जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असून, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊ शकतो. नागरिकांनी काळजी घेऊन सतर्क राहावे, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा: शिराळा तालुक्यात बिबट्याचा थरार, घरात घुसला, पाळीव प्राण्यांवर हल्ला.