सांगली : शहरात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून चार जणांची सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्याला 40 हजार रुपये पगार देण्याचे आश्वासन देत आरोपींनी चौघांकडून प्रत्येकी ₹31,500 अशी रक्कम घेतली. मात्र पैसे घेतल्यानंतर कोणालाही नोकरी न देता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.
या प्रकरणी आशिष रामचंद्र सोनावणे (रा. मिथिलानगरी, पत्रकारनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून ऑगस्टीन जोसेफ गजभिव (रा. शेवगाव, अहमदनगर) आणि श्रीदेवी शीतल पाटील (रा. गल्ली नंबर 6 विद्यानगर, वारणाली, सांगली) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सोनावणे यांचा शेअर ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. आरोपींनी त्यांचा तसेच आणखी तीन जणांचा विश्वास संपादन करून “क्लू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह डिपार्टमेंट”च्या सांगली शाखेत नोकरी देण्याचे आश्वासन दिले. महिन्याला 40,000 रुपये मानधन मिळेल, असे सांगून जून 2024 मध्ये चार जणांकडून एकूण ₹1,26,000 रुपये जमा करून घेण्यात आले.
पैसे घेतल्यानंतर नोकरी न देता सतत वेळकाढूपणा सुरू केल्याने चौघांनाही फसवले गेल्याची जाणीव झाली. अखेर आशिष सोनावणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीची दखल घेत संजयनगर पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.
हेही वाचा: सांगलीत भाजपच्या 78 जागांसाठी 570 अर्ज, निवड प्रक्रियेवर मोठा ताण.



