Kavathe Mahankal News | सांगली : कवठेमहांकाळ येथे डॉ. जगन्नाथ म्हेत्रे यांच्या घरावर चित्रपट स्पेशल 26 सारखा बनावट आयकर छापा टाकून दागिने व रोकड लुटणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. गुरुवारी तिघांना कोल्हापूर आणि पुणे येथे पकडल्यानंतर शुक्रवारी अक्षय सुरेश लोहार (30, रा. हुक्केरी, बेळगाव) आणि शकील गौस पटेल (44, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) पोलिसांसमोर शरण आले.
या प्रकरणात आतापर्यंत दीक्षा राष्ट्रपाल भोसले, पार्थ महेश मोहिते आणि साई दीपक मोहिते यांना अटक झाली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल 1 कोटी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने डॉ. म्हेत्रे यांच्या घरातून 1 किलो 410 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 15 लाख 60 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती.
दरम्यान, मुख्य सूत्रधार महेश शिंदे आणि त्याचा साथीदार आदित्य मोरे अजूनही फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. अटक झालेल्या अक्षय लोहार आणि शकील पटेल यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना दि. 24 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार महेश शिंदे याचे कुटुंब वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याची पत्नी मुंबईतील शासकीय रुग्णालयात परिचारिका असून, वडील डॉक्टर आहेत. मात्र शिंदे अद्याप फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा: मिरजेत सोमवारपासून अंबाबाई नवरात्र महोत्सव – 71 वर्षांच्या परंपरेतून रसिकांना सुरेल मेजवानी.