सांगली : सांगली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली असून जनतेने नव्या चेहऱ्यांना निवडून दिले आहे. या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सर्व महापालिकांच्या महापौर पदासाठीची आरक्षण सोडत येत्या गुरुवारी मुंबई येथे चिठ्ठीद्वारे होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या सोडतीतून सांगली महापालिकेचे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव राहणार हे स्पष्ट होणार असून, त्यानंतरच सत्तास्थापनेची आणि महापौर निवडीची अंतिम दिशा ठरणार आहे. आरक्षणाच्या निकालावर सर्वच राजकीय पक्षांची पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे.
निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 39 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. त्यामुळे महापौर पदावर भाजपचा उमेदवार विराजमान होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र, महापौर पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी जाहीर होते, यावर अंतिम निर्णय अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, महापौर पदाच्या निवडीसाठी पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून, इच्छुक नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. आरक्षण जाहीर होताच उमेदवारी निश्चित करण्यासाठी संबंधित पक्षांकडून हालचाली अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, काँग्रेससह विरोधी पक्षांनीही महापौर पदासाठी आपली पुढील भूमिका आरक्षणाच्या निकालानंतर ठरवण्याचे संकेत दिले आहेत. नगरविकास विभागाने यापूर्वीच प्रशासनाकडून महापालिकेतील महापौर पदाच्या आरक्षणाबाबतची माहिती मागवली होती.
राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत होणार असून, त्यापैकी सुमारे 50 टक्के म्हणजेच 15 महापालिकांचे महापौर पद महिलांसाठी राखीव राहण्याची शक्यता आहे. सांगली महापालिकेत यापूर्वी ओबीसी महिला अनुसूचित जाती ओबीसी पुरुष या प्रवर्गासाठी आरक्षण लागू झाले होते. यावेळी सर्वसाधारण महिला व अनुसूचित जाती महिला या दोन प्रवर्गासाठी आरक्षण निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच सांगली महापालिकेतील सत्तासमीकरण आणि महापौर पदाचा चेहरा स्पष्ट होणार आहे.
- जतच्या पाणीटंचाईवरून सर्वपक्षीय आंदोलन; म्हैसाळचे आवर्तन, टँकरसह 7 मागण्यांसाठी रास्ता रोको
- सांगलीत दूध घेऊन घरी चाललेल्या महिलेच्या गंठणाला हिसका; अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार
- मिरजेत एसटी वाहकाला वाचवताना पोलिसावर हल्ला; धारदार हत्याराने भोसकले
- Sangli Crime: विट्यात शिक्षिकांना अश्लील पत्रे पाठविल्याचा आरोप; कडेगावातील संशयिताला अटक
- पुण्यातून वृद्धाचे अपहरण, सांगलीत मारहाणीत मृत्यू; कॅनॉलमध्ये मृतदेह टाकल्याचा पोलिसांचा उलगडा
- Sangli Accident: रेणावी घाट अपघातातील मृतांच्या वारसांना प्रत्येकी ₹१० लाखांची मदत










