सांगली : सांगली–मिरज–कुपवाड शहर महानगरपालिकेने मालमत्ता कराच्या थकबाकीदारांविरोधात कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून, म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून, संपूर्ण महापालिका क्षेत्रात विशेष वसुली व जप्ती मोहीम राबविण्यात येणार असून, थकबाकीदारांच्या मालमत्तांवर थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे.
महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या मोहिमेत विशेषतः वाणिज्य (Commercial) मालमत्तांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. वारंवार नोटिसा देऊनही मालमत्ता कर न भरलेल्या थकबाकीदारांवर कोणतीही सवलत न देता थेट जप्ती व सीलची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
विशेष पथकांची नियुक्ती
या विशेष मोहिमेसाठी शहर व प्रभाग समितीनिहाय तीन स्वतंत्र विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांच्या थेट नियंत्रणाखाली कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक पथकात कर अधीक्षक, वॉरंट अधिकारी तसेच आवश्यक सहाय्यक कर्मचारी असतील. प्रत्येक पथकास दररोज किमान २५ मालमत्तांवर कारवाई करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
निवडणूक कामकाजासोबतच वसुली
सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, निवडणूकविषयक कामकाजासोबतच ही वसुली व जप्ती मोहीम समांतरपणे राबविण्यात येणार आहे. थकबाकी मोठ्या प्रमाणावर असल्यास, गरज भासल्यास संबंधित मालमत्तांचा लिलाव (Auction) करण्याची कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सूचित केले आहे.
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांचे आवाहन
महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी नागरिकांना स्पष्ट शब्दांत आवाहन करत सांगितले की,
“नवीन वर्षात जप्तीची कारवाई व नामुष्की टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर त्वरित भरावा. कोणत्याही दबावाशिवाय सर्व थकबाकीदारांविरोधात ही मोहीम राबविण्यात येईल. तसेच कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.”
नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
जप्तीची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या नागरिक सुविधा केंद्रात (CFC) किंवा ऑनलाईन पद्धतीने थकीत मालमत्ता कर तात्काळ भरून त्याची पावती जवळ ठेवावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा: वयोमर्यादेमुळे उमेदवार अपात्र; आमदार गोपीचंद पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे वयोसवलतीची मागणी.
- बंगळुरू-मुंबई स्लीपर वंदे भारतवरून नवा वाद; सांगली-बेळगावला डावलले जाणार?
- सांगलीत युवा पिढीला तंबाखूपासून दूर राहण्याचे आवाहन; 2025-26 या वर्षात एकूण 2361 जणांचे समुपदेशन
- सांगली जिल्ह्यात 16 मेपासून जनगणना 2027 चा पहिला टप्पा सुरू; 4,421 प्रगणक घराघरात जाऊन डिजिटल घरगणना करणार
- कवठेमहांकाळ शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरू; 8 वी ते पदवी विद्यार्थ्यांना मोठी संधी
- बिरोबा देवस्थान पर्यटन विकासासाठी ₹149 कोटींच्या आराखड्यास मंजुरी
- संखमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा गोळ्या झाडून खून; तीन तासांत दोघांना अटक










