Sangli Today | तासगाव : सावर्डे (ता. तासगाव) येथील फुटका घाणा परिसरात अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक द्राक्षबाग पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी (20 डिसेंबर) दुपारी घडली. या आगीत राहुल दिलीप पाटील यांच्या मालकीची एक एकर द्राक्षबाग पूर्णपणे जळून खाक झाली असून, शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गट क्रमांक 666 मध्ये असलेल्या ‘अनुष्का’ जातीच्या सुमारे 1,450 द्राक्षझाडांची ही बाग तोडणीसाठी सज्ज अवस्थेत होती. प्रत्येक झाडावर 20 ते 25 घड लागले होते. यंदा अंदाजे 3,500 ते 4,000 पेट्या दर्जेदार द्राक्ष उत्पादन अपेक्षित असताना, अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण बाग आगीत नष्ट झाली.
फळ छाटणीला सुमारे 60 दिवस पूर्ण झाले होते. दरम्यान, तणनाशक फवारणीमुळे बागेतील गवत वाळलेले असल्याने आगीने झपाट्याने पेट घेतला. या आगीत द्राक्षमालासह झाडे, ठिबक सिंचन व्यवस्था, काठ्या व इतर साहित्य जळून खाक झाले.
द्राक्षबागेचे मालक राहुल पाटील हे कामानिमित्त गुजरात येथे गेले होते. बागेत कोणी नसल्याची संधी साधूनच अज्ञात व्यक्तीने आग लावली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. गावी परतल्यानंतर संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. तलाठी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी पंचनामा केला. मेहनतीने फुलवलेली बाग एका क्षणात नष्ट झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून केली जात आहे.
हेही वाचा: सांगलीत सार्वजनिक मुताऱ्या आहेत… पण आत जाण्याची हिंमत होते का?.
- तासगाव फाट्याजवळ टेम्पोने अचानक वळण घेतल्याने अपघात; आयशर टेम्पोखाली सापडून दुचाकीस्वार गंभीर जखमी
- सांगली पेठभाग भाजी मंडईतील ₹20.50 लाखांचा काँक्रिट रस्ता 6 महिन्यांत पूर्ण होणार का? नागरिकांचे लक्ष
- सांगली पोलीस भरती 2024-25; 737 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र, अधिकृत यादी जाहीर
- गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील हिप्परकर टोळी तडिपार; सांगली-सोलापूर जिल्ह्यात प्रवेशबंदी
- भिलवडीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; वाहनचालक फरार
- एनओसीवरून वाद पेटला; सांगलीत वकिलाच्या घरात घुसून धमकी, चौघांवर गुन्हा









