सांगली : जिल्ह्यातील माधवनगर परिसरात रविवारी सकाळी रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत २३ वर्षीय तरूणाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली. मृत तरूणाचे नाव अमन दीपक आवळे असे असून, तो माधवनगर रविवार पेठेतील अवचितनगर येथे कुटुंबासोबत राहत होता.
अमन काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना दोन दिवसांपूर्वी तो शासकीय रुग्णालयातून पळून घरी आला होता. रविवारी पहाटे तो दुचाकी घेऊन घराबाहेर पडला. काही तासांतच माधवनगर रेल्वे स्टेशन परिसरात त्याचा मृतदेह रेल्वेखाली चिरडलेल्या अवस्थेत आढळला.
घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, अमनच्या डोक्यावरून रेल्वेचे चाक गेल्याने ओळख पटणे अवघड झाले होते. पोलिसांनी तपास केल्यावर त्याच्या खिशातून आधार कार्डची झेरॉक्स प्रत मिळाली आणि त्यावरून त्याची ओळख पटली.
या घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. मृतदेह ताब्यात घेऊन सांगली शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून आत्महत्या की हत्या याबाबतचा तपास सुरू आहे.
🔴 हेही वाचा 👉 Sangli Crime: बनावट आयकर अधिकार्यांचा बनाव करून कवठेमहांकाळच्या डॉक्टरांच्या घरी कोट्यवधींचा दरोडा.