सांगली : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्पर्धांमध्ये सहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या वतीने शासकीय व स्वयंसेवी संस्थांतील तसेच शाळांमधील बालकांसाठी तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कै. दादू काका भिडे व सौ. सुंदरबाई मालू मुलींचे बालगृह निरीक्षण गृह, सांगली येथे या महोत्सवाला सुरुवात झाली असून, हा उपक्रम 7 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत चालणार आहे.
उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून बोलताना, स्पर्धेत यश किंवा अपयशापेक्षा उत्साहाने सहभागी होणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि संघभावना विकसित होते, अस ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी विविध संस्थांतील विद्यार्थ्यांनी केलेल्या पथसंचलनाची पाहणी केली. तसेच गणित व रोबोटिक्स प्रदर्शनास भेट देऊन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. दीपप्रज्वलन व आकाशात फुगे सोडून बाल महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष तथा प्रमुख न्यायदंडाधिकारी प्रियांका करवंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष निवेदिता ढाकणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.
तीन दिवस चालणाऱ्या या बाल महोत्सवात कबड्डी, खो-खो, क्रिकेट, रिले यांसारखे सांघिक खेळ, कॅरम व बुद्धिबळसारखे बौद्धिक खेळ, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा तसेच सामूहिक गायन व नृत्य यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा: 20 लाखांवरील रस्ते व इमारत कामांसाठी COEP कडून थर्ड पार्टी ऑडिट बंधनकारक; महापालिका आयुक्त सत्यम गांधी.
- इराण-इस्रायल तणावामुळे तेल दर वाढणार? सांगलीत पेट्रोल 104.07 रुपये; सध्या दरवाढ नाही
- विटा-कराड मार्गावर भीषण अपघात; जखमी महिलेचा 10 दिवसांनी मृत्यू
- सांगली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची निवड 13 मार्चला; इच्छुकांकडून मोर्चेबांधणी
- सांगलीत कृष्णा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर; ‘हजारो मासे मृत, 5 लाख नागरिकांच्या आरोग्यास धोका’
- कवठेमहांकाळमध्ये 2.88 किलो गांजा जप्त; तस्कर अटकेत
- सांगलीत ‘आमदार केसरी 2026’ भव्य बैलगाडी शर्यत; विजेत्यास 1 लाखांचे बक्षीस









