सांगली : सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे यंदा सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. दरवर्षी ऑगस्टच्या सुरुवातीपासून द्राक्ष छाटणीला सुरुवात होत असते, मात्र यंदा सप्टेंबरअखेरपर्यंत केवळ ३ टक्के क्षेत्रातच छाटणी झालेली आहे. त्यामुळे द्राक्षांचा हंगाम किमान महिनाभर उशिरा सुरू होणार असून, ग्राहकांना द्राक्षांची चव उशिरा चाखायला मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अनियमिततेमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यंदाही मे महिन्यात अवकाळी पावसाने द्राक्ष काडी परिपक्व होण्याची प्रक्रिया बिघडवली. जून-जुलैमध्येही ढगाळ वातावरण कायम राहिल्याने पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याचा परिणाम द्राक्षांच्या वाढीवर झाला.
निर्यातीवर परिणामाची शक्यता
साधारणपणे डिसेंबर-जानेवारीत आखाती देशांत द्राक्षांना मोठी मागणी असते. मात्र, हंगाम उशिरा सुरू झाल्यास निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यास बाजारभाव घसरू शकतो आणि द्राक्ष बागायतदारांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
प्रमुख द्राक्ष उत्पादन जिल्हे
महाराष्ट्रातील नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर आणि बीड हे प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हे आहेत. यापैकी नाशिक आणि सांगली द्राक्ष उत्पादणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा: या योजनेमुळे सांगलीतील अनेक तरुणांनी उभे केले स्वतःचे उद्योग-व्यवसाय; सात वर्षांत ९१८ कोटींचे कर्जवाटप.