मुंबई/सांगली (सांगली टुडे न्यूज नेटवर्क): दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या एकत्रित ३,००० रुपयांच्या निधीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेच्या हप्त्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय जाहीर न झाल्याने राज्यातील कोट्यवधी लाभार्थी भगिनींची प्रतीक्षा आणखी वाढली आहे.
या बैठकीत शासनाने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची अग्रीम मदत आणि अंगणवाडी सेविका व मदतनीसांना प्रत्येकी २,००० रुपयांची भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला, परंतु लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात १,५०० रुपये जमा होणार की ३,००० रुपये, याबाबतचा उल्लेख करण्यात आला नाही.
मंत्रिमंडळात निर्णय लांबणीवर पडण्याचे नेमके कारण काय?
नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाचा मुख्य भर राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीवर होता. खरीप हंगामातील नुकसानीमुळे राज्यातील ३०५ तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करणे, शेतकऱ्यांना तातडीने ५ हजार रुपयांची मदत देणे आणि १२ मोठ्या सवलती लागू करणे यावरच बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाली.
त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या २,००० रुपये भाऊबीज भेटीचा प्रस्ताव प्राधान्याने मंजूर करण्यात आला. दुष्काळ निवारण आणि इतर प्रशासकीय धोरणांना बैठकीत प्राधान्य मिळाल्याने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा विषय आजच्या अधिकृत अजेंड्यावर येऊ शकला नाही, अशी माहिती समोर येत आहे.
दिवाळीपूर्वी ३,००० रुपये मिळणार का?
भाऊबीज आणि दिवाळी सणाचा विचार करता पात्र महिलांना ऐन दिवाळीत हा लाभ दिला जाण्याची शक्यता अजूनही कायम आहे.
राज्य शासनाकडून दिवाळीपूर्वी स्वतंत्र शासकीय आदेश (GR) काढून दोन्ही महिन्यांचा (सप्टेंबर + ऑक्टोबर) मिळून थेट ३,००० रुपयांचा हप्ता महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. अथवा केवळ सप्टेंबर महिन्याचे १,५०० रुपये जमा केले जाऊ शकतात.
शासन स्तरावरून पुढील २-३ दिवसांत याबाबतचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




